निफाड तालुक्यातील ५८७६ मंजुर लाभार्थ्यांना मिळणार हक्काचे घर.. आज मिळणार आवास योजना टप्पा २ मधील लाभार्थ्यांना पहिला हप्ता…

निफाड तालुक्यातील ५८७६ मंजुर लाभार्थ्यांना मिळणार हक्काचे घर..
आज मिळणार आवास योजना टप्पा २ मधील लाभार्थ्यांना पहिला हप्ता…
महेश साळुंके /लासलगाव
नाशिक जिल्ह्यातीप सर्व पंचायत समित्या आणि सर्व ग्रामपंचायतमध्ये ऑनलाईन व्हीसीचे थेट प्रक्षेपण करण्याचे आणि सदरच्या कार्यक्रमास प्रसिध्दीस देण्याचे आवाहन नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी यांना आदेश दिले.
ग्रामीण भागासाठी प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र शासनाने सुरु केलेली महत्वकांक्षी योजना आहे. केंद्र शासनच्या या महत्वकांक्षी योजनेच्या ग्रामीण टप्पा दोनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी सुमारे २० लाख घरकुलांचे उद्दिष्ट दिले आहे. त्याप्रमाणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील या २० लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देणे तसेच १० लाख लाभार्थ्यांना पाहिला हप्ता अनुदान वितरणाचा कार्यक्रम दिनांक २२ फेब्रुवार २०२५, वार शनिवार रोजी दुपारी ३ वाजता व्हिसी द्वारे करण्याचे प्रस्तावित केल्याची माहिती पंचायत समिती निफाडचे गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील यांनी दिली. तसेच सदरचा कार्यक्रम हा उत्सव स्वरूपात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी जाधव यांनी दिली आहे.
आज (दि. २२) निफाड तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत ५८७६ मंजुर लाभार्थ्यांना देशाचे गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ऑनलाईन लाईव्ह पहिला हप्ता वितरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघवयास मिळत आहे.
प्रशासनाच्या वतीने पंचायत समिती निफाड येथे आयोजित करण्यात आलेल्या लाईव्ह कार्यक्रमास खासदार भास्कर भगरे, आमदार दिलीप बनकर व छगनराव भुजबळ यांना उपस्थित राहणेकामी निमंत्रण दिल्याची माहीती गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनिल पाटील, विस्तार अधिकारी राजेश थोरात, प्रशांत बोरसे यांनी दिली आहे.
तसेच ग्रामपंचायत स्तरावर विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचे आदेश देऊन या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत मधील मान्यवर, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व खात्याचे कर्मचारी तसेच संबंधीत पत्र लाभार्थी हे उपस्थित राहणार आहेत. तरी सदरच्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रदर्शन ग्रामपंचायत आणि पंचायत समिती स्तरावर आयोजीत करण्यात आलेला असुन त्यास सर्वांनी उपस्थीत रहावे असे शासनाच्या वतीने गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनिल पाटील यांनी आवाहन केले आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, उपसरपंच, सदस्य, लोकप्रतिनिधी, सर्व खात्यातील अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी यांना सदरच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी सर्वोतपरी जनजागृती व प्रसिध्दी करण्याच्या सुचना करण्यात आलेल्या होत्या.