स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यातील बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीत लासलगांव बाजार समिती नाशिक विभागात सलग तिसऱ्यांदा प्रथम तर राज्यात चौथ्या क्रमांकावर – डी. के. जगताप

महेश साळुंके-मुख्य संपादक
लासलगांव, दि. २४ :- जागतिक बँक अर्थसहाय्यित मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परीवर्तन (SMART) प्रकल्पांतर्गत राज्यातील बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीत नाशिक विभागात लासलगांव कृषि उत्पन्न बाजार समितीची सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांकाने तर राज्यात चौथ्या क्रमांकावर निवड झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती डी. के. जगताप यांनी दिली.
राज्यात जागतिक बँक अर्थसहाय्यित मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परीवर्तन (SMART) प्रकल्प राबविण्यात येत असुन या प्रकल्पांतर्गत बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी प्रकाशित करणे हा एक प्रमुख घटक आहे. त्याअंतर्गत बाजार समितीच्या वार्षिक कामगिरीच्या आधारावर मुल्यांकन करून राज्यभरातील बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी प्रकाशित करणे अपेक्षित होते. त्यानुसार पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (कृषि पणन) यांचेमार्फत बाजार समित्यांमधील पायाभुत व इतर सेवा सुविधा निकषांसाठी 80 गुण, आर्थिक निकषांसाठी 35 गुण, वैधानिक कामकाज निकषांसाठी 55 गुण व इतर निकषांसाठी 30 गुण असे एकुण 200 गुण निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार प्रकल्प अंमलबजावणी कक्षाने ठरवुन दिलेल्या गुणांकनानुसार लासलगांव बाजार समितीच्या सन 202३-2४ या वर्षाच्या वार्षिक कामगिरीची पहाणी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, निफाड यांचे कार्यालयाने करून वस्तुनिष्ठ गुणांकनाचा प्रस्ताव पणन संचालनालयातील स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्षास सादर केला होता. त्याप्रमाणे प्रकल्प अंमलबजावणी कक्षाने सदर प्रस्तावाची छाननी करून सन 202३-2४ या वर्षाच्या वार्षिक क्रमवारीत लासलगांव बाजार समितीस एकुण 200 गुणांपैकी 157.5 गुण देऊन राज्यस्तरीय क्रमवारीत चौथा तर नाशिक विभागात प्रथम क्रमांक दिलेला आहे.
नुकतेच अमृत महोत्सवी वर्ष पार केलेल्या लासलगांव कृषि उत्पन्न बाजार समितीने गेल्या 78 वर्षांमध्ये शेतकरी बांधव व इतर बाजार घटकांसाठी उभारणी केलेल्या विविध पायाभुत सुविधा, आर्थिक व वैधानिक कामकाज, शेतकरी बांधवांसाठी राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या विविध योजना, उपक्रम यातील कामगिरी उल्लेखनीय असल्याने स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचे प्रमुख तथा राज्याचे पणन संचालक विकास रसाळ यांचे अध्यक्षतेखालील समितीने राज्यस्तरीय क्रमवारीत लासलगांव बाजार समितीस चौथ्या क्रमांकाचे तर नाशिक विभागात सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांकाचे मानांकन निश्चित केले असल्याचे बाजार समितीस कळविले आहे.
लासलगांव बाजार समितीने शेतमाल विक्रीची व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने व्यापारी वर्गाशी समन्वय साधुन अमावस्या, शनिवार व इतर शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी लिलावाचे कामकाज सुरू केल्यामुळे वर्षभरात लिलावाचे कामकाज वाढले. तसेच उन्हाळ्यात व पावसाळ्यात शेतीमाल लिलावासाठी मुख्य व उपबाजार आवारांवर भव्य लिलाव शेडची उभारणी करून निफाड उपबाजार आवारावर फळे व भाजीपाला तर मानोरी खुर्द तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर भुसार व तेलबिया शेतीमालाचे लिलाव सुरू करून शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध करून दिला आहे असे डी. के. जगताप यांनी सांगितले.
बाजार समिती शेतकरी बांधव व इतर मार्केट घटकांच्या हितासाठी व त्यांच्या शेतीमालाला अधिकाधिक भाव मिळण्याच्या दृष्टीकोनातुन स्पर्धाक्षम बाजार व्यवस्था निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या सोई व सुविधांची उभारणी तसेच शेतकरी लाभाच्या आणखी योजना / उपक्रम कायदेशीर तरतुदीनुसार राबविणेसाठी नक्कीच अपेक्षांची पुर्तता करेल अशी आशा व्यक्त करून बाजार समितीच्या उत्तरोत्तर विकासासाठी राज्याचे पणन संचालक श्री. विकास रसाळ यांनी बाजार समितीतील सर्व घटकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यात गेल्या तीन वर्षापासुन बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीर करण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील 305 बाजार समित्यांमध्ये लासलगांव बाजार समितीने नाशिक विभागात सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक पटकाविला असुन बाजार समितीच्या या यशात आमचे सर्व सहकारी सदस्य, शेतकरी बांधव, अडते, व्यापारी, माथाडी / मापारी कामगार, मदतनीस, बाजार समितीचे सचिव, इतर अधिकारी व कर्मचारी यांचा सिंहाचा वाटा असुन नियमनमुक्तीनंतरही 05 जिल्ह्यातील शेतकरी बांधव आपला शेतीमाल विक्री करणेसाठी लासलगांव बाजार समितीसच प्राधान्य देत असल्याने यापुढेही शेतकरी हितासाठी बाजार समिती कटीबध्द आहे.
संदीप (ललित) दरेकर, उपसभापती,
नाशिक विभागातील सर्वच बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत असल्याने येथील बाजार समित्यांच्या उत्पन्नात कांद्यापासुन मिळणाऱ्या बाजार फी चा मोठा वाटा असतो. मात्र सन २०२२-२३ मध्ये कांद्याच्या बाजारभावात घसरण झाल्याने नाशिक विभागातील सर्वच बाजार समित्यांच्या उत्पन्नात घट झाली होती. परिणामी नाशिक विभागातील बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीत घसरण झालेली आहे. लासलगांव बाजार समितीच्या उत्पन्नात देखील 12 टक्के घट झालेली असल्याने बाजार समितीस आर्थिक निकषातील 15 गुण कमी मिळाल्यामुळे सन 2023-24 च्या वार्षिक क्रमवारीत लासलगांव बाजार समिती चौथ्या क्रमांकावर आलेली आहे. मात्र सलग 03 वर्षापासुन नाशिक विभागात प्रथम क्रमांक राखण्यात बाजार समितीस यश मिळालेले आहे. वार्षिक क्रमवारीत प्राप्त केलेल्या प्रथम क्रमांकाचे स्थान कायम राखण्यासाठी आम्ही सर्वजण कटीबध्द आहोत.
नरेंद्र वाढवणे, सचिव,