Breaking
ब्रेकिंग

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लासलगाव पोलिस स्टेशनच्या नूतन इमारतीचे लोकार्पण पोलीस वसाहतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार; पोलीस विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करावा – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

0 1 0 7 4 4

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लासलगाव पोलिस स्टेशनच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

पोलीस वसाहतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार; पोलीस विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करावा – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

महेश साळुंके /लासलगाव

लासलगाव :-लासलगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसराचा विस्तार बघता आगामी काळात पोलिस स्टेशनची एपीआयची पोस्ट पीआयमध्ये दर्जोन्नत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे येथील पदे देखील वाढणार आहे. त्याचबरोबर पोलीस वसाहतीच्या प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे, त्यासाठी पोलीस विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करावा अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या.

महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्या.मुंबई यांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या लासलगाव पोलिस स्टेशनच्या नूतन इमारतीचे लोकार्पण राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील, पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, अधीक्षक अभियंता सपना कोळी, पोलीस उपअधीक्षक निलेश पालवे, सहायक पोलिस निरिक्षक भास्कर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पवन सुपणार, श्री.वाळके, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, भाऊसाहेब भवर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, जयदत्त होळकर, डॉ.श्रीकांत आवारे, सरपंच योगिता पाटील, रामनाथ शेजवळ, अनिता ब्रम्हेचा, मंगेश गवळी, धर्मेश जाधव, मच्छिंद्र थोरात, बाळासाहेब पुंड, सचिन दरेकर, अफजल शेख, शिवाजी सुपनर, संतोष राजोळे, पांडुरंग राऊत, कंत्राटदार प्रशांत सारडा, आर्किटेक्ट जयंत कोलते यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, लासलगाव परिसराचा वाढता विस्तार आणि कामकाज सुलभ व्हावे यासाठी लासलगाव पोलिस स्टेशनच्या इमारतीसाठी सुमारे ४.५० कोटी रूपये खर्च करून आज अद्ययावत सोई सुविधा असलेली सुसज्ज नूतन इमारत उभारण्यात आलेली आहे. भविष्यातील वाढणारी पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता पोलिस वर्गाला काम करण्यासाठी ही इमारत अतिशय सोईची ठरणार आहे. लासलगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असल्याने याठिकाणी दिवसभर शेतकरी वर्गाची मोठी वर्दळ असते. तसेच मोठी आर्थिक उलाढाल याठिकाणी होत असते. त्यामुळे येथे कुठलाही गैरप्रकार होणार नाही यासाठी पोलिस यंत्रणेने तितकेच सतर्क राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, विस्तारत असलेल्या या शहरात कायदा व सुव्यवस्था कशी राखली जाईल याकडे देखील पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे. लासलगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसराचा विस्तार बघता आगामी काळात पोलिस स्टेशनची एपीआयची पोस्ट पीआय मध्ये दर्जोन्नत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे येथील पदे वाढणार आहे. तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी वसहतीचा प्रश्न मार्गी लाऊन सुसज्ज पोलिस निवासस्थाने निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत. यासाठी आपण नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यामुळे लवकरच हा प्रश्न देखील मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, लासलगाव परिसराचा वाढता विस्तार बघता अनेक विकासाची कामे आपण याठिकाणी हाती घेतली आहे. लासलगाव बसस्थानक, लासलगाव विंचुर रस्ता चौपदरीकरण, बाह्य वळण रस्ता, शिवनदीवरील पाटोदा रस्त्याला जोडणारा पूल, उपजिल्हा रुग्णालय बांधकाम यासह अनेक महत्वाची कामे आपण हाती घेतली आहे. अप्पर तहसील कार्यालय तयार करण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून येणाऱ्या काळात मंत्री असो किंवा नसो कुठल्याही निधीची कमतरता पडणार नसून लासलगाव परिसरात ही जास्तीत जास्त विकासाची कामे मार्गी लावली जातील असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की,लासलगाव शहराच्या सुरक्षेसाठी अग्निशामक यंत्रासाठी ९० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्यात यावा अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील, ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अधीक्षक अभियंता सपना कोळी, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, जयदत्त होळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

2/5 - (1 vote)

नवप्रभा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे